top of page
Search

थंडी आली त्वचेला जपा!

डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात थंडी जाणवू लागली आहे. थंडीच्या दिवसांत सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढते. परंतु शरीराचे संरक्षण करणारा सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे आपली त्वचा. थंडीच्या काळात त्वचेचा संरक्षक स्निग्ध पदार्थांचा थर कोरडा होतो, ज्यामुळे त्वचेवर विविध समस्यांचा सामना करावा लागू शकतो.


काही जणांच्या त्वचेत जन्मतः स्निग्ध घटकांचे प्रमाण कमी असते, त्यामुळे त्यांची त्वचा अधिक कोरडी होऊन खवले येणे, पायांना भेगा पडणे आणि हिवाळा असह्य होणे, असे त्रास जाणवतात. झेरोसिस हा त्वचेचा आजार हिवाळ्यात अधिक बळावतो. अशा प्रकारच्या त्रासांमध्ये त्वचा कोरडी होणे, लालसर पुरळ येणे, खाज सुटणे आणि जखमा होणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात.


ऑटोपिक त्वचारोग:

ज्या मुलांना सर्दी, शिंका येणे किंवा दम्याची प्रवृत्ती असते, त्यांना ऑटोपिक त्वचासंवेदनशीलता असते. अशा मुलांमध्ये त्वचेचा कोरडेपणा, डोळ्यांखाली काळी वर्तुळे, लालसर मान, पुरळ, आणि एक्झिमा यांसारख्या समस्याही जाणवतात.


सिबोरीक डर्मटायटिस:

हिवाळ्यात डोक्याच्या त्वचेत चिकट कोंडा, नाकाच्या कडांजवळ, दाढी, छाती किंवा स्काल्पवर खाज, पुरळ, आणि लालसरपणा यांसारखी लक्षणे दिसतात.


त्वचेची काळजी कशी घ्यावी?

थंडीत जास्त वेळ आंघोळ करणे टाळावे.

आंघोळीसाठी गरम पाण्याऐवजी कोमट पाणी वापरावे.

सौम्य साबण व शाम्पूचा वापर करावा.

अंग ब्रशने किंवा दगडाने घासू नये; अंगपुष्टा हलक्या हाताने पुसावी.

आंघोळीनंतर त्वचेवर मॉइश्चरायझर लोशन, चेहऱ्यावर क्रीम, आणि ओठांवर लिप जेल लावावे.

ओठ कोरडे असल्यास त्यावर जीभ फिरवणे टाळावे; त्यामुळे ओठ जास्त कोरडे होतात आणि पुरळ येऊ शकते.


केसांची काळजी:

स्त्रियांनी आठवड्यातून दोन वेळा रात्री तेल लावून सकाळी शाम्पूने केस धुवावेत. पुरुष रोज केस धुवू शकतात; मात्र आठवड्यातून दोन-तीन वेळाच शाम्पू वापरावा.


थंडीपासून संरक्षण:

बाहेर जाताना स्वेटर, टोपी, आणि स्कार्फचा वापर करावा, जेणेकरून थंड वारं त्वचेला लागू शकणार नाही.


पौष्टिक आहार आणि व्यायाम:

पौष्टिक आहार, नियमित व्यायाम आणि भरपूर पाणी पिणे यामुळे त्वचेचे आरोग्य टिकून राहते.


त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या:

जर त्वचेच्या समस्या निर्माण झाल्या, तर सोशल मीडियावरील किंवा इंटरनेटवरील उपायांवर अवलंबून राहू नका. त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरेल.

सुरक्षित आणि आनंदी हिवाळा:

या सर्व गोष्टींचे पालन केल्यास आपला हिवाळा निश्चितच निरोगी आणि आनंददायी होऊ शकतो.

 
 
 

Comments


  • alt.text.label.YouTube
  • alt.text.label.Facebook
  • alt.text.label.Instagram

Skin Specialist Near Me

Created By Deep Ajay Ovhal, Enlightened Technologist pvt. ltd

©2022 by MARVEL SKIN, HAIR AND LASER CLINIC

bottom of page